रम्य ते बालपण - आठवणींचा कोलाज -१
(काळ साधारण सन 1970 ते 1973)
माझी मोठी बहीण यमुताई. ती तालुक्याचे ठिकाण आजरा इथ शहरात रहायची. हो शहरच कारण मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं तेच पहिलं शहर होतं. तिचे यजमान म्हणजेच माझे भाऊजी तेथील व्यंकटराव हायस्कूल मध्ये मराठी चे शिक्षक होते.
तिच्या लग्नात मी दीड एक वर्षांचा होतो असेन, त्यामुळे तिचा लग्न समारंभ मला आठवण केवळ अशक्यप्राय म्हणजे मला बिलकुलच आठवत नाही. ती प्रथम आठवते , जेंव्हा ती कधी तिची छोटी मुलगी सीमा आणि मुलगा जितू ला घेऊन, म्हाई करिता माझ्या छोट्याशा गावी म्हणजेच तिच्या माहेरी देवर्डे ला आमच्या बैल गाडीतून भुजंग दादा सोबत आली असेल.
नंतर त्यांच्या सोबत माझ्या पेक्षा मोठी पण माझी छोटी बहीण "छाया माई" आणि सगळ्यांनाच जिचा आदरयुक्त धाक होता ती "आजऱ्याची अक्का" (आत्या ) कांही समारंभ निमित्ताने किंवा म्हाई करिता आजऱ्याहून देवर्डे ला नेहमीच येत असत. ही मंडळी फक्त येणार आहेत अस कळल तरी त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहण व्हायच. मनातून आनंद व्हायचा. त्यांच्या येण्याची सायंकाळची वेळ होताच शाळेच्या मागील उंच ठिकाणी बुरुजा वरुण लांब दिसणाऱ्या “वेळवट्टी” च्या काजू बागेतून चालत येणाऱ्या त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या आकृत्यांचा वेध घेत, वाट पाहत, खूप वेळ पर्यन्त उभ राहण व्हायच.
कारण ते त्यांच शहरी दिसणं , बोलणं , स्वच्छ राहणं, वागणं छान वाटायच. एवढंच नाही तर मुंबई ला राहून आलेल्या प्रत्येक गावकऱ्यांच्या चकचकीत पणाचं पण असच कौतुक आणि अप्रूप वाटायच. मला अजून आठवतय आमच्या गल्लीतील अंबाजी पाटील आणि त्याची पत्नी त्यांच्या साधारण आमच्याच वयाच्या दोन छोट्या मुलींसह दोन-तीन वर्षातून एकदा मे च्या उन्हाळी सुट्टीत मुंबई हुन गावी येत असत. तेंव्हा मी आणि माझ्या वयाची चुलत भावंडं त्यांना कुतुहला पोटी बघायला जात असू. त्यांच ते स्वच्छ दिसण , शुद्ध बोलण , त्यांचा मॉडर्न पेहराव बघून ती कुण्या वेगळ्याच जगातील माणसे वाटत. त्यांना पाहून आपल्याला पण अस कधी होता येईल का? मुंबई ला जाऊन आलेली माणसे जर अशी होतात, आमूलाग्र बदलतात तर आपल्याला ही मुंबई ला कधी जाता येईल का अस अगदी मनापासून वाटत राहायच.
कालांतराने नोकरी-धंद्याच्या निमित्ताने , माझ्या आयुष्यातील सर्वात ज्यादा कालावधी मी याच मुंबई नगरीमध्येच व्यतीत केला,करत आहे. असो..
यमुताई ने कौतुकाने छोट्या सीमा साठी स्वतः शिवलेले नवीन फ्रॉक्स आणि फॅन्सि ड्रेसेस तसेच सीमाच्या केसांचा केलेला बॉब कट पाहून अप्रूप वाटायच आणि त्यावरून छोट्या सीमाला चिडवण ही व्हायच , नुकतेच चालता येणाऱ्या छोट्याशा जितूला घातलेला इवलासा छान आणि स्वच्छ शर्ट आणि आणि इवलीशी चड्डी बघून तर मला त्याचं विशेष कौतुक वाटायचं कारण आम्ही समवयीन चुलत भावंडे आणि गावांतील इतर समवयीन मुलांपेक्षा ते खूप वेगळ आणि नविन होतं. कारण त्याकाळी आम्हा मुलांच्या अंगावर फक्त मळकट सदरा असे आणि खाली चड्डी असण्याची गरज असायचीच असे नाही आणि मुलींच्या अंगावर मळकट फ्रॉक असे, तो पण अधून मधून उसवलेला आणि त्यांच्या डोक्याचा तर पार सत्य साईबाबा झालेला असायचा.
पुढे ज्यावेळी कधी मी शाळेत जायला लागलो तेंव्हा पाठीमागून खांद्यावरून दोन पट्टेरी बंध घेऊन पुढे बांधायची चड्डी घालायला लागलो तेंव्हा काय तो मॉडर्न आणि शहरी झाल्याचा आनंद झाला होता.
क्रमश...
लेखक: बाळासाहेब उर्फ सुधाकर तानवडे

No comments:
Post a Comment