Thursday, April 18, 2024

कोंबल्या भाल्या

रम्य ते बालपण -आठवणींचा कोलाज - ४

(काळ साधारण सन 1970 ते 1973)

साधारणपणे गावातील प्रत्येक घराच्या परसदारी जनावरांच्या गोठ्यासोबतच कोंबड्यांच खुराड बहुदा असायचंच. मग प्रत्येकाच्या गरजेनुसार, आवडीनुसार किंवा ऐपतीनुसार त्या खुराड्याचा आकार कमी-जास्त असायचा. संध्याकाळ होताच लहान मोठ्या कोंबड्यांचा फौज फाटा कॉक-कॉक-कॉक आणि चि-चि-चि करत आपल्या-आपल्या घरी परतत असे मग त्यांना बांबूच्या बेळां पासून बनवलेल्या डालग्याच्या खाली किंवा कधी मोठ्या बुट्टि खाली झाकलं जायचं. डालग्याच्या खाली भाताच्या बारीक कोंड्याचा एक थर टाकला जायचा. मग त्यावर खाण्यासाठी धान्य किंवा कोंबड्यांच खाद्य टाकल जायच. पिण्यासाठी एखाद्या ॲल्युमिनियमच्या ताटली मध्ये पाणीही ठेवलं जायचं. घरातील कोंबड्यांच्या संख्येनुसार डालग्यांचा आकार छोटा-मोठा असायचा.ही बांबूची डालगी/बुट्टि गावातीलच बुरूड बांधवांकडून बनवून घेतली जात. आमच्या ही घरी कांहीस असंच चित्र होत.
मला अजून आठवतंय, दारात सगळ्याचीच कोंबडी सकाळ-संध्याकाळ कॉक-कॉक, चि-चि करत दाणे टिपत स्वैर फिरत असायची. त्यामध्ये कोंबडा,कोंबडी, तलंगा, बारीक पिल्लांन सोबत त्यांची आई कोंबडी असे एक-मेकांचे नातेवाईक आणि शेजारी-पाजारी असत.
बर्याचदा बाजूच्या घरातील माझी चुलत बहीण मंगल्याका दारात येऊन फक्त आपल्याच कोंबड्यांना ऑ-ऑ -ऑ करून बोलवायची आणि तांदळातील वेचलेले भातकुटे किंवा इतर तत्सम धान्य त्यानाच खाऊ घालायची. बाकीच्या कोंबड्यांना जवळ आल्या की हुसकाऊन लावायची. अर्थात हाकलून दिलेल्या कोंबड्यात आमच्याही कोंबड्या असायच्या.असा हा दुजाभाव साधारण सगळेच कोंबडी मालक करत असावेत. मात्र माझ्या प्रत्यक्ष नजरेत, मंगल्याकाच हे वर्तन नेहमीच येत असल्यामुळे,तिचा हा दुजाभाव माझ्या बालमनाला बिलकुल आवडायचा नाही तशातच तिचा एक मगरूर कोंबडा आमच्या कोंबडीला सतत त्रास द्यायचा. कधी पाहावे तेंव्हा याचा आपला पाठलाग चालूच. आमच्या कोंबडीला नुसती हैराण करून सोडायचा. वारंवार "ते " त्याच त्रासदायक "कृत्य" बघून माझ्या बालमनावर या अन्यायाचा खोल परिणाम झाला होता. पण मंगल आक्काला मी स्पष्टपणे या एकंदरीत प्रकारांबद्दल विचारू पण शकत नव्हतो. कारण सकाळी गुरे-ढोरे सोडल्यावर पार गोठ्या पासुन ते थेट जवळच्या गोठना पर्यंत, मौज-मज्जा करत,आम्ही छोटी चुलत भावंड, गावातील बुरुडाकडून खास आमच्यासाठी बनवून घेतलेल्या बांबूच्या छोट्या बुट्ट्या(कुरकू) घेवुन, मंगल्याकाच्याच लीडर शिप मध्ये गुरांच्या मागून शेण धरायला जात असु आणि आईच्या जळणासाठी शेणी बनवण्याच्या कामात खारीचा वाटा उचलत असू. मी जर का या तथाकथित अन्यायाचा जाब मंगल्याकाला विचारला असता आणि मग तिने माझ्याशी कट्टी-फू करून असहकार पुकारला असता तर! ते मला कदापि परवडणार नव्हत.
मात्र माझ्या मनाची ही घुसमट दिवसागणिक वाढतच चालली होती. अखेर तो मला हवा असणारा आणि खूप दिवस वाट बघायला लावणारा दिवस उजाडलाच तसेच माझ्या बाल मनात धुमसनारा तो असंतोष भसा-भस बाहेर काढणारा तो प्रसंग शेवटी घडलाच.
त्याच काय झालं, सकाळची वेळ होती. नुकताच उठून ,मी बाहेर कट्ट्यावर येऊन बसलो होतो. पक्षांची किलबिल चालु होती. मधूनच एखाद्याचा तोंड धुतानाचा खाकरण्याचा आवाज तार स्वरात वातावरणात गुंजत होता. रस्त्यावर वर्दळ पण नेहमीच्या मानाने खूपच तुरळक होती . नेहमी प्रमाणेच सगळ्या भाऊबंदांनी तसेच शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी सोडलेली कोंबडी इकडे तिकडे कॉक-कॉक आवाज करत , इकड बघ , तिकड बघ ,खाली बघ , समोर बघ करत मिळेल ते दाणे , किडे टिपत स्वैर संचार करत फिरत होती. आणि इटूकली-पीटुकली छोटी पिल त्यांच्या गुबगुबीत आई सोबत कोंडाळ करून चि-चि चा गुंजारव करत चरत फिरत होती.
कट्ट्याच्या एका कोपर्यावर आमचा भीमा गडी गुळगुळीत दगडावर कोयत्याला धार काढण्यात गुंग होता. कट्ट्याच्या दुसऱ्या बाजूला अलक्याका पाण्याने चुळा भरत, खाकरत तोंड धूत बसली होती. मंगल्याका कालच तिच्या मामाच्या गावाला गेली होती. अलक्याका तोंड धुवून नुकतीच घरात गेली.
अन एवढ्यात पाहतो तर काय! मला जो पाहीजे होता तो मोका आज जुळून आला होता. कारण माझ्या अगदीच समोर तो व्हिलन कोंबडा मान ताठ करून बांग देत ,ऐटीत दाणे टिपत उभा होता. आविर्भाव असा की जणू काय तो या एरिया चा दादाच. आज काय याला सोडायचं नाही. आज याला चांगलाच धडा शिकवायचा हे मी आता मनोमनी ठरवलंच होत की एवढ्यातच आमची कोंबडी त्याच्या शोधक नजरेच्या टप्प्यात आली, ककॉक-कॉक-कॉक-कॉक करत आज त्यानं पुन्हा एकदा आमच्या त्या पीडित कोंबडीची पाठ धरली. कोंबडी जिवाच्या आकांताने याला टाळत पुढे धावते आणि हा पठ्या फाड फाड फाड करत मागे. आता मात्र माझा संताप अनावर झाला होता. मी रागा सरशी जवळच पडलेला दगड उचलला आणि दिला त्या कोंबड्याच्या दिशेने जोरात भिरकावून. आणि काय ! माझा कधीही न बसणारा नेम, बरोबर त्या वेळी, त्या कोंबड्याच्या वर्मी बसला होता. कोंबडा जोरजोराने ओरडत तिरीमिरीत जाऊन बाजुला तडफडत आडवा पडला. मला एवढा काय आसुरी आनंद झाला म्हणुन सांगु. मी तिथूनच त्वेषाने कोंबड्याकडे बघत बोबड्या भाषेत उद्गारलो. “काय लं ये!! कोंबल्या भाल्या. लोज-लोज बगतोय , भाल्या, लांदच्या आमच्याच कोंबलीला तलास देतोस आणि पाकलतोस बी. आता बत बोंबलत”.
हे माझे बोबडे उद्गार ऐकून आणि माझा एकूणच जमदग्नी अवतार बघून, जवळच कोयता पाजरत बसलेला भीमा गडी आणि गल्लीतून जाणारे एक दोघे स्तिमित झाले. आणि माझ्याकडे बघतच राहिले. आता मात्र मी घाबरलो कारण मला वाटलं, मी मंगल्याकाच्या कोंबड्याला मारलं म्हणून आता माझं नाव हे लोक आता तीला नक्की सांगणार. मग आता माझ काय खरं नाही. मला अक्षरशः ब्रम्हांड आठवल. पण झालं वेगळंच. त्यांना माझ्या एकंदरीत वागण्यात बोलण्यात काय विनोद वाटला काय माहीत, पण ते माझ्याकडे आणि एकमेकांकडे आळी-पाळीन बघून खो-खो हसतच सुटले. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. हायस वाटल. आणि मी मात्र इकड-तिकड न बघता पटकन घरात धुम ठोकली.
पुन्हा पुढे जेंव्हा-जेंव्हा, आयुष्याच्या विविध टप्प्यावर गावाकड गेल्यावर हे "त्या" प्रसंगाचे साक्षीदार भेटले, तेंव्हा-तेंव्हा त्या प्रसंगाची हसून आठवण करून देत राहीले. त्यामुळे तो प्रसंग माझ्यासाठी वेगळ्या अर्थानी “अविस्मरणीय” ठरला.
क्रमश...
लेखक: बाळासाहेब उर्फ सुधाकर तानवडे

Monday, April 15, 2024

चुलत भावंडे आणि धमाल

रम्य ते बालपण -आठवणींचा कोलाज - ३

(काळ साधारण सन 1970 ते 1973)
सकाळचा घरातील शिरस्ता साधारणपणे असा असे ..
आई-बाबा आणि भावंड प्रातःकाली उठुन राखुंडीने दात घासून, तोंड धुवून आणि इतर महत्वाची कामे आटोपून स्वयंपाक घरात सामूहिक चहापानासाठी जमत असत, आई किंवा बहिणी कडून चूल शाडून सारवून चुलीवर चहाच आदन ठेवलं जायचं. मग चहा घेता घेताच, चुली समोर शेकत-शेकत, काल झालेल्या कामाचा आढावा घेतला जायचा. तसेच आज शेतात काय काय काम करायची? किती गडी माणस बोलवायची याचा प्लॅन सकाळच्या जड झालेल्या आवाजात सुरू असायचा. त्यातूनच आईची जेवणाची लगभग चालू झालेली असायची. घरातील आंघोळीच्या पाण्याचा हौद, पिण्याच्या पाण्याचे दोन मोठे तांब्याचे डेरे आणि एक मातीचं मडकं भरण्यासाठी दोन किलोमीटर लांब झऱ्या वरुण किंवा नदी वरुण काखेत एक आणि डोईवर एक अशा तांब्याच्या घागरी घेऊन दोघी बहीणींच्या पाण्याच्या खेपा गल्लीतील इतर मुली-बायासोबत चालू झालेल्या असायच्या.
मी मात्र सकाळी जाग येताच, तोंड धुतल नाही धुतल, चहा प्यायला नाही प्यायला करत, बाहेर सम वयस्क चुलत भावंडांच्या बोकाळण्याच्या आवाजाने दारात धूम ठोकायचो. बाहेर थंडी असेल तर सगळेजण धुमी(शेकोटी ) भोवती शेकत बसलेले असत किंवा इतर वेळी मातीत खेळत, कोंडाळे करून चिवचिवाट करत बसलेले असायचे. शेकोटी असेल तर स्वतःची सासू आणल्याशिवाय शेकोटी जवळ नवीन मेंबरला एंट्री नसायची. सासू म्हणजे काय? तर धुमीत आहुति देण्यासाठी आजु-बाजुला पडलेले सुके गवत, सुकलेला पाला-पाचोळा किंवा काट्या-कुट्या आणणे .
या सकाळच्या सत्रातील दैनिक बालसभेची अध्यक्षा बऱ्याचदा अलक्याका(अलका आक्का) असायची. ही साधारण माझ्या छाया माईच्या वयाची. ही आम्हा बाल गोपाळात सीनियर होती म्हणून तिला आम्ही अलका आक्का, संक्षिप्त करून अलक्याका म्हणत असू. नंतर त्याही पुढे जाऊन अलक्या काका म्हणत असू. मग याच नियमाने इतर ही मोठ्या चुलत बहिणीना मंगल आक्का ला 'मंगल्या काका', तसेच लील्या काका ,'बण्या काका' ,'कमळ्या काका' म्हणत असू . तुम्हाला प्रश्न पडला असेल. जर चुलत्याला "काका" म्हणत असाल तर हा गोंधळ कसा सावरायचा? पण हा आमच्यासाठी गोंधळ नव्हताच मुळी कारण आम्ही आमच्या चुलत्याना 'तात्या' म्हणत असू . असो.
तर ही अलक्या काका बर्याचदा भुताखेताच्या आणि इतरही बऱ्याच कान्या(कहान्या) आम्हा पामराणा रंगवून सांगायची आणि आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन एकाग्रतेन ऐकायचो. काय रमून जायचो त्यात. त्या श्रोतुवृंदा मध्ये बऱ्याचदा मी, कल्पी(कल्पना), आवण्या(अरुण) आणि मधु दादा असायचो. हो समवयस्क असला तरी "मधु दादा" च, "मध्या" नाही बर का!. याबद्दल विस्ताराने थोडं नंतर. कधी कधी आमच्या पेक्षा एक-दोन वर्षांनी छोटे असणारे संज्या(संजू ), किरण्या(किरण), धोंडीची पण उपस्थिती असायची.
शिव्यांची लाखोली अथकपणे कशी वाहायची हे बाळकडू पण इथलंच. एकमेकांशी खेळतांना काय बिनसलं की अगदी एखादा मंत्र म्हणावं तसे एका लईत उद्घोशीत होणारी ती अव शब्दांची शृंखला प्रत्येकालाच अगदी मुखोद्गत होती. मात्र माझ्या बाबतीत म्हणाल तर, या नव्याने विकसित झालेल्या विशेष स्किल साठी, बक्षीस म्हणून घरात वारंवार मिळणार्या धम्मक-लाडु आणि चापट-पोळी मुळे माझी या विषयातील प्रगति इतरांच्या मानाने जरा लवकरच खुंटली.
खेळण्यासाठी माझे हक्काचे सवंगडी असायचे, माझ्याच वयाची चुलत भावंडे कल्पि आणि अवण्या. तसेच पुन्हा गल्लीतील इतर मुल ही बऱ्याचदा असायची. जस की चाळक्यांचा वस्या,दिवेकरांचा राजा,गणप्या तसेच गुरवाचा दिनक्या. सीजन प्रमाणे बदलणारे विविध खेळ घरात,गल्लीत सतत खेळत असू. जस की गोट्या,विटी-दांडू ,लंगडी,पळा-पळी,घुंपट फिरवणे,पतंग बनवून गोठणावर मोकळ्या जागेत उडवणे आणि बरेच. एकमेकांचे हाथ धरून साखळीने धावत समोरील भिडूला पकडण्यासाठी तर गावभर हुंदडत पळायचो. तसेच काजूच्या सीजन मध्ये काजूचा खेळही अगदी तहान भुक हरपुन खेळला जायचा. पावसाळ्यात पावसाच प्रमाण खुप असल्यामुळे घराच्या वरील मजल्यावरील भल्या मोठ्या लाकडी माडीवर अलक्याका,कल्पी सोबत काचा-कवड्या, दोरी उड्या सारखे मुलींचे खेळ सुद्धा खेळत असू. तसेच गल्लीतील सगळे बाल- गोपाळ जमुन, दोन संघ करून दडून-मिडून (लपा-छपी) ची धमाल सुद्धा माडीवरच धान्यांच्या कणगी,तट्टे, दरवाजे, लाकडे,अंथरूने यांच्या मागे लपून करत असु. एखादा आपला लपलेला भिडू समोरील हुडकणाऱ्या पार्टीला सापडत नसेल तर त्यांना चिडवत "आमच्या धन्याला हुडकून काढा की हुडकून काढा! नाहीतर हार माना " असं एका सुरात म्हणत पूर्ण घर डोक्यावर घेत असु. या दंग्यान, ऐन दुपारी, घर आणि गल्ली दणाणून जात असे. त्यात लाकडी माडी च्या धाड-धाड आवाजाची भर पडे. आणि असा खेळ रंगात आलेला असतानाच खाली दुपारी वामकुक्षी घेणारे आमचे "आबा" म्हणजेच माझे चुलते किंवा समोरील घरातील तापट "होडग्याचा मामा" झोपमोड झाल्यामुळे हाताला मिळेल ती काठी किंवा लाकूड घेऊन येत असत आणि हाताला मिळेल त्याला जंगी प्रसाद देवूनच या रंगलेल्या खेळाची मग सांगता करीत असत.
तसेच लग्नाच्या सीजन मध्ये म्हणजे उन्हाळ्यात बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे बार उडवत असु. माझी आजी जुन्या कपड्यांचे तुकडे करून तसेच तालुक्याच्या ठिकाणच्या शंकर शिंप्या कडून आणलेले तुकडे जोडून मोठया सुई दोऱ्यानी ओट्यावर वाकळ शिवत बसलेली असायची. तर तिच्याकडून कधी मागून, तर कधी ढापून मिळवलेल्या चिंध्यापासून आमचे नवरा-नवरी आणि त्यांचा कपडे पट आकार घ्यायचा. कागदाची बाशिंगे आणि चुरमुऱ्याच्या मुंडावळ्यानी ते लुटू पुटूचे नवरा-नवरी अजूनच सजायचे. मग लग्नात जे जे विधी पाहिलेले असायचे ते ते विधी जमेल तसे सांग्रसंगीत साजरे व्हायचे. एकदा तर आम्ही छोट्या संजू आणि शेजारच्या छोट्या सुमिच लुटुपुटूच लाईव लग्नच लावल होत. त्यावेळी छोट्या सुमिन लाजत-लाजत घेतलेला उखाणा आणि सुपारी सोडण्याच्या खेळातील " संजू -संजू सुपारी सोड " म्हटलेले आठवून आजही हसू येत.
मधु दादा बर्याचदा आम्ही खेळत असलेल्या बऱ्याचशा खेळांपासून अलिप्त असायचा.कारण त्याला खेळात हारण मान्य नसायच. त्याच्या या स्वभावामुळे माझी पण त्याच्याशी बर्याचदा बाचाबाची होऊन कट्टी फू असायची. पण माझ "तुझ माझ जमेना पण तुझ्यावाचून करमेना" या उक्ती प्रमाणे होत. त्यामुळे पहल करून त्याच्याशी "बट्टी" प्रथम मलाच करावी लागायची. कारण चुलत असला तरी मोठा भाऊ या नात्याने मला सतत त्याची गरज भासायची. थोडे दिवसच टिकणारा, कट्टी फू चा काळ वगळता, मी सतत त्याच्या सोबतच असायचो. तो जाईल तिकडे मी शेपटासारख आहेच. रवळनाथाच्या देवळात प्रत्येक सणाला.. बरोबर!, गावभर सत्य- नारायणाच्या पूजेचा प्रसाद घ्यायला.. बरोबरच!, सोंगी भजन बघायला.. बरोबर! , गावातील लग्नांच्या दुसर्या दिवशी सकाळी नवरा-नवरी चे मांडवातले खेळ बघायला सुद्धा बरोबरच.
तो माझ्या पेक्षा एखाद्या वर्षांनीच मोठा असेल पण दरारा असा की मला मधु दादा म्हणणं भाग पडायच.
मात्र हे ही तितकंच खर.. दरारा फक्त माझ्या पुरताच. इतर मोठ्या भावंडांसमोर तो शांत,अबोल आणि अगदीच शामळू होता..
क्रमश...
लेखक: बाळासाहेब उर्फ सुधाकर तानवडे

Saturday, April 13, 2024

भावंडे की पालक

रम्य ते बालपण -आठवणींचा कोलाज -२

(काळ साधारण सन 1970 ते 1973)

आम्ही एकूण नऊ सख्खी भावंडे, पाच बहिणी आणि चार भाऊ. त्यामध्ये मी सर्वात लहान, त्यामुळं सगळ्यांचच लाडक शेंडेफळ.
माझ्या काही भावंडात आणि माझ्यात अक्षरशः एका जनरेशनच अंतर होत. आता हेच बघा ना. जेंव्हा सगळे सांगत यमुताई माझी मोठी बहीण आहे. पण माझ्या बाल मनाला त्यावेळी काही बाळबोध प्रश्न हमखास पडत असत , ती बहीण आहे तर ती माझ्यापेक्षा एवढी मोठी कशी? तिची मुले माझ्याच वयोगटातली कशी?
तेंव्हा जास्तीत जास्त मी माझ्या पेक्षा सहा वर्षानी मोठा भाऊ मुकुंद दादा आणि तीन वर्षानी मोठी बहीण छाया माई यांनाच काय ती माझी भावंडं समजत होतो. कारण या दोघांबरोबरच समवयीन भावंडांप्रमाणे खेळण, दंगा-मस्ती, मारा-माऱ्या, एकमेकांना चिडवण,बोचकारण व्हायच. त्यात मी लहान असल्यामुळे सतत चिडवून घेण, मार खाण माझ्याच वाट्याला जास्त यायच तो भाग वेगळा.
त्यात पुन्हा मुकुंद दादा, आजऱ्यात तालुक्याच्या ठिकाणी शिकायला असल्यामुळे माझ्यावर दादागिरी करत सतत मला माझ्या गावंढळ बोलण्यावरून, वागण्यावरून चिडवायचा. सारख खुळ!, खुळा!! म्हणून हिणवायचा. असं चिडवून या दादा लोकांना काय आसुरी आनंद मिळतोय ते तेच जाणोत बिचारे. कारण अगदी तस्संच माझ्या दोन मुलांमध्येही त्यांच्या लहानपणी होत. माझा मोठा मुलगा शुभम, त्याच्या सहा वर्षांनी छोट्या असलेल्या भावाला, सोहमला अगदी अस्साच छळायचा. असो.
पण मी माझ्या सर्व भावंडात लहान असल्यामुळे या सो कॉल्ड दादागिरी करण्याच्या अनुभवापासून वंचित राहिलो हे माझे सुदैव की दुर्दैव मला माहीत नाही.
तर मुकुंद दादाच ते सततच चिडवणं माझ्या बालमनाला असह्य वेदना देणार व्हायच. पण एव्हढ्यावरच माझा हा त्रास संपत नव्हता पुन्हा त्याच ऐकून छाया माई आणि छोटी भाची सीमा पण त्याचीच री ओढायच्या. त्यावेळी मी अगदीच एकटा पडायचो. आणि माझा सात्विक संताप सातवं आसमान गाठायचा, पण मी बिचारा कांहीच करू शकायचा नाही. मग असहायपणे, हिरमुसला होऊन, रडत आई कडे धाव घ्यायचो. मग आई त्यांना दटावल्यासारखं करत, "तुला चिडवणाऱ्यांची आणि त्रास देणाऱ्यांची आपण उन्हात घरं बांधूया". अस नेहमीचच गुळमुळीत आश्वासन देत माझी कशीबशी समजुत काढायची.
मात्र या उलट बाकीची माझी मोठी भावंड, माझी भावंड कमी आणि पालक च जास्त होती. जसे की मारुती दादा ,विठा ताई,भुजंग दादा तसेच लग्नाला आलेल्या माझ्या मोठ्या बहिणी आक्काताई आणि बायाक्का. या दोघी तर मला पोटच्या मुलाच कराव इतक करायच्या. त्यांच ते मला प्रेमान आंघोळ घालन, आंघोळीचा शेवटचा तांब्या डोक्यावरून ओतताना “म्हातारा हो! “ म्हणुन आशीर्वाद देण, पावडर लाऊन कपाळावर आणि गालावर काजळाची तिठ लावण, खायला गुरगुटा दूध-भात करून भरवण, माझ दुखल खुपल बघण, माझ छोट्या-मोठ्या गोष्टी वरुण कौतुक करण ,सतत लाड लाड करण, काखेत घेऊन गावभर भाऊबंद-नातेवाईकांकडे सणा-समारंभाना फिरवून आणण. असे जरा प्रमाणा पेक्षा जास्तच लाड करायच्या. हे मला अजूनही लख्ख आठवतंय. आणि या अतिलाडाचा परिणाम म्हणून की काय नकळतपणे, मी कौतुकान तोंडाचा चंबू करून लाडीक - लाडीक बोलायला शिकलो होतो. हट्टी झालो होतो.
कधी बहीणीं किंवा आई सोबत आजऱ्याला जाण व्हायच तेंव्हा आजऱ्याच्या आत्याची माझ ते लाडीक-लाडीक बोलण ऐकून चीड-चीड व्हायची. मग याबद्दल आईला आणि बहिणींना तिच्या तोंडच्या तोफखान्याला सामोरं जाव लागायच. तिच ऐकून घ्याव लागायच. “काय गं ! सुध्या चा नुसता लाडोबा करून ठेवलाय तुम्ही मायलेकींनी. अशान त्याला खुळ करून टाकाल सगळ्याजणी मिळून". त्याला आता तरी शाळेत टाका! काय घरातच घेऊन बसणार आहात?”. असं आणि बरंच कांही..
क्रमश...
लेखक: बाळासाहेब उर्फ सुधाकर तानवडे
May be a black-and-white image of 1 person and child

All reac

शहर आणि खेडे

रम्य ते बालपण - आठवणींचा कोलाज -१ 

(काळ साधारण सन 1970 ते 1973)

माझी मोठी बहीण यमुताई. ती तालुक्याचे ठिकाण आजरा इथ शहरात रहायची. हो शहरच कारण मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं तेच पहिलं शहर होतं. तिचे यजमान म्हणजेच माझे भाऊजी तेथील व्यंकटराव हायस्कूल मध्ये मराठी चे शिक्षक होते.
तिच्या लग्नात मी दीड एक वर्षांचा होतो असेन, त्यामुळे तिचा लग्न समारंभ मला आठवण केवळ अशक्यप्राय म्हणजे मला बिलकुलच आठवत नाही. ती प्रथम आठवते , जेंव्हा ती कधी तिची छोटी मुलगी सीमा आणि मुलगा जितू ला घेऊन, म्हाई करिता माझ्या छोट्याशा गावी म्हणजेच तिच्या माहेरी देवर्डे ला आमच्या बैल गाडीतून भुजंग दादा सोबत आली असेल.
नंतर त्यांच्या सोबत माझ्या पेक्षा मोठी पण माझी छोटी बहीण "छाया माई" आणि सगळ्यांनाच जिचा आदरयुक्त धाक होता ती "आजऱ्याची अक्का" (आत्या ) कांही समारंभ निमित्ताने किंवा म्हाई करिता आजऱ्याहून देवर्डे ला नेहमीच येत असत. ही मंडळी फक्त येणार आहेत अस कळल तरी त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहण व्हायच. मनातून आनंद व्हायचा. त्यांच्या येण्याची सायंकाळची वेळ होताच शाळेच्या मागील उंच ठिकाणी बुरुजा वरुण लांब दिसणाऱ्या “वेळवट्टी” च्या काजू बागेतून चालत येणाऱ्या त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या आकृत्यांचा वेध घेत, वाट पाहत, खूप वेळ पर्यन्त उभ राहण व्हायच.
कारण ते त्यांच शहरी दिसणं , बोलणं , स्वच्छ राहणं, वागणं छान वाटायच. एवढंच नाही तर मुंबई ला राहून आलेल्या प्रत्येक गावकऱ्यांच्या चकचकीत पणाचं पण असच कौतुक आणि अप्रूप वाटायच. मला अजून आठवतय आमच्या गल्लीतील अंबाजी पाटील आणि त्याची पत्नी त्यांच्या साधारण आमच्याच वयाच्या दोन छोट्या मुलींसह दोन-तीन वर्षातून एकदा मे च्या उन्हाळी सुट्टीत मुंबई हुन गावी येत असत. तेंव्हा मी आणि माझ्या वयाची चुलत भावंडं त्यांना कुतुहला पोटी बघायला जात असू. त्यांच ते स्वच्छ दिसण , शुद्ध बोलण , त्यांचा मॉडर्न पेहराव बघून ती कुण्या वेगळ्याच जगातील माणसे वाटत. त्यांना पाहून आपल्याला पण अस कधी होता येईल का? मुंबई ला जाऊन आलेली माणसे जर अशी होतात, आमूलाग्र बदलतात तर आपल्याला ही मुंबई ला कधी जाता येईल का अस अगदी मनापासून वाटत राहायच.
कालांतराने नोकरी-धंद्याच्या निमित्ताने , माझ्या आयुष्यातील सर्वात ज्यादा कालावधी मी याच मुंबई नगरीमध्येच व्यतीत केला,करत आहे. असो..
यमुताई ने कौतुकाने छोट्या सीमा साठी स्वतः शिवलेले नवीन फ्रॉक्स आणि फॅन्सि ड्रेसेस तसेच सीमाच्या केसांचा केलेला बॉब कट पाहून अप्रूप वाटायच आणि त्यावरून छोट्या सीमाला चिडवण ही व्हायच , नुकतेच चालता येणाऱ्या छोट्याशा जितूला घातलेला इवलासा छान आणि स्वच्छ शर्ट आणि आणि इवलीशी चड्डी बघून तर मला त्याचं विशेष कौतुक वाटायचं कारण आम्ही समवयीन चुलत भावंडे आणि गावांतील इतर समवयीन मुलांपेक्षा ते खूप वेगळ आणि नविन होतं. कारण त्याकाळी आम्हा मुलांच्या अंगावर फक्त मळकट सदरा असे आणि खाली चड्डी असण्याची गरज असायचीच असे नाही आणि मुलींच्या अंगावर मळकट फ्रॉक असे, तो पण अधून मधून उसवलेला आणि त्यांच्या डोक्याचा तर पार सत्य साईबाबा झालेला असायचा.
पुढे ज्यावेळी कधी मी शाळेत जायला लागलो तेंव्हा पाठीमागून खांद्यावरून दोन पट्टेरी बंध घेऊन पुढे बांधायची चड्डी घालायला लागलो तेंव्हा काय तो मॉडर्न आणि शहरी झाल्याचा आनंद झाला होता.
क्रमश...
लेखक: बाळासाहेब उर्फ सुधाकर तानवडे
May be an image of 1 person, beard and fog


All react

कोंबल्या भाल्या

रम्य ते बालपण -आठवणींचा कोलाज - ४ (काळ साधारण सन 1970 ते 1973) साधारणपणे गावातील प्रत्येक घराच्या परसदारी जनावरांच्या गोठ्यासोबतच कोंबड्यां...