रम्य ते बालपण -आठवणींचा कोलाज - ४
(काळ साधारण सन 1970 ते 1973)
साधारणपणे गावातील प्रत्येक घराच्या परसदारी जनावरांच्या गोठ्यासोबतच कोंबड्यांच खुराड बहुदा असायचंच. मग प्रत्येकाच्या गरजेनुसार, आवडीनुसार किंवा ऐपतीनुसार त्या खुराड्याचा आकार कमी-जास्त असायचा. संध्याकाळ होताच लहान मोठ्या कोंबड्यांचा फौज फाटा कॉक-कॉक-कॉक आणि चि-चि-चि करत आपल्या-आपल्या घरी परतत असे मग त्यांना बांबूच्या बेळां पासून बनवलेल्या डालग्याच्या खाली किंवा कधी मोठ्या बुट्टि खाली झाकलं जायचं. डालग्याच्या खाली भाताच्या बारीक कोंड्याचा एक थर टाकला जायचा. मग त्यावर खाण्यासाठी धान्य किंवा कोंबड्यांच खाद्य टाकल जायच. पिण्यासाठी एखाद्या ॲल्युमिनियमच्या ताटली मध्ये पाणीही ठेवलं जायचं. घरातील कोंबड्यांच्या संख्येनुसार डालग्यांचा आकार छोटा-मोठा असायचा.ही बांबूची डालगी/बुट्टि गावातीलच बुरूड बांधवांकडून बनवून घेतली जात. आमच्या ही घरी कांहीस असंच चित्र होत.
मला अजून आठवतंय, दारात सगळ्याचीच कोंबडी सकाळ-संध्याकाळ कॉक-कॉक, चि-चि करत दाणे टिपत स्वैर फिरत असायची. त्यामध्ये कोंबडा,कोंबडी, तलंगा, बारीक पिल्लांन सोबत त्यांची आई कोंबडी असे एक-मेकांचे नातेवाईक आणि शेजारी-पाजारी असत.
बर्याचदा बाजूच्या घरातील माझी चुलत बहीण मंगल्याका दारात येऊन फक्त आपल्याच कोंबड्यांना ऑ-ऑ -ऑ करून बोलवायची आणि तांदळातील वेचलेले भातकुटे किंवा इतर तत्सम धान्य त्यानाच खाऊ घालायची. बाकीच्या कोंबड्यांना जवळ आल्या की हुसकाऊन लावायची. अर्थात हाकलून दिलेल्या कोंबड्यात आमच्याही कोंबड्या असायच्या.असा हा दुजाभाव साधारण सगळेच कोंबडी मालक करत असावेत. मात्र माझ्या प्रत्यक्ष नजरेत, मंगल्याकाच हे वर्तन नेहमीच येत असल्यामुळे,तिचा हा दुजाभाव माझ्या बालमनाला बिलकुल आवडायचा नाही तशातच तिचा एक मगरूर कोंबडा आमच्या कोंबडीला सतत त्रास द्यायचा. कधी पाहावे तेंव्हा याचा आपला पाठलाग चालूच. आमच्या कोंबडीला नुसती हैराण करून सोडायचा. वारंवार "ते " त्याच त्रासदायक "कृत्य" बघून माझ्या बालमनावर या अन्यायाचा खोल परिणाम झाला होता. पण मंगल आक्काला मी स्पष्टपणे या एकंदरीत प्रकारांबद्दल विचारू पण शकत नव्हतो. कारण सकाळी गुरे-ढोरे सोडल्यावर पार गोठ्या पासुन ते थेट जवळच्या गोठना पर्यंत, मौज-मज्जा करत,आम्ही छोटी चुलत भावंड, गावातील बुरुडाकडून खास आमच्यासाठी बनवून घेतलेल्या बांबूच्या छोट्या बुट्ट्या(कुरकू) घेवुन, मंगल्याकाच्याच लीडर शिप मध्ये गुरांच्या मागून शेण धरायला जात असु आणि आईच्या जळणासाठी शेणी बनवण्याच्या कामात खारीचा वाटा उचलत असू. मी जर का या तथाकथित अन्यायाचा जाब मंगल्याकाला विचारला असता आणि मग तिने माझ्याशी कट्टी-फू करून असहकार पुकारला असता तर! ते मला कदापि परवडणार नव्हत.
मात्र माझ्या मनाची ही घुसमट दिवसागणिक वाढतच चालली होती. अखेर तो मला हवा असणारा आणि खूप दिवस वाट बघायला लावणारा दिवस उजाडलाच तसेच माझ्या बाल मनात धुमसनारा तो असंतोष भसा-भस बाहेर काढणारा तो प्रसंग शेवटी घडलाच.
त्याच काय झालं, सकाळची वेळ होती. नुकताच उठून ,मी बाहेर कट्ट्यावर येऊन बसलो होतो. पक्षांची किलबिल चालु होती. मधूनच एखाद्याचा तोंड धुतानाचा खाकरण्याचा आवाज तार स्वरात वातावरणात गुंजत होता. रस्त्यावर वर्दळ पण नेहमीच्या मानाने खूपच तुरळक होती . नेहमी प्रमाणेच सगळ्या भाऊबंदांनी तसेच शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी सोडलेली कोंबडी इकडे तिकडे कॉक-कॉक आवाज करत , इकड बघ , तिकड बघ ,खाली बघ , समोर बघ करत मिळेल ते दाणे , किडे टिपत स्वैर संचार करत फिरत होती. आणि इटूकली-पीटुकली छोटी पिल त्यांच्या गुबगुबीत आई सोबत कोंडाळ करून चि-चि चा गुंजारव करत चरत फिरत होती.
कट्ट्याच्या एका कोपर्यावर आमचा भीमा गडी गुळगुळीत दगडावर कोयत्याला धार काढण्यात गुंग होता. कट्ट्याच्या दुसऱ्या बाजूला अलक्याका पाण्याने चुळा भरत, खाकरत तोंड धूत बसली होती. मंगल्याका कालच तिच्या मामाच्या गावाला गेली होती. अलक्याका तोंड धुवून नुकतीच घरात गेली.
अन एवढ्यात पाहतो तर काय! मला जो पाहीजे होता तो मोका आज जुळून आला होता. कारण माझ्या अगदीच समोर तो व्हिलन कोंबडा मान ताठ करून बांग देत ,ऐटीत दाणे टिपत उभा होता. आविर्भाव असा की जणू काय तो या एरिया चा दादाच. आज काय याला सोडायचं नाही. आज याला चांगलाच धडा शिकवायचा हे मी आता मनोमनी ठरवलंच होत की एवढ्यातच आमची कोंबडी त्याच्या शोधक नजरेच्या टप्प्यात आली, ककॉक-कॉक-कॉक-कॉक करत आज त्यानं पुन्हा एकदा आमच्या त्या पीडित कोंबडीची पाठ धरली. कोंबडी जिवाच्या आकांताने याला टाळत पुढे धावते आणि हा पठ्या फाड फाड फाड करत मागे. आता मात्र माझा संताप अनावर झाला होता. मी रागा सरशी जवळच पडलेला दगड उचलला आणि दिला त्या कोंबड्याच्या दिशेने जोरात भिरकावून. आणि काय ! माझा कधीही न बसणारा नेम, बरोबर त्या वेळी, त्या कोंबड्याच्या वर्मी बसला होता. कोंबडा जोरजोराने ओरडत तिरीमिरीत जाऊन बाजुला तडफडत आडवा पडला. मला एवढा काय आसुरी आनंद झाला म्हणुन सांगु. मी तिथूनच त्वेषाने कोंबड्याकडे बघत बोबड्या भाषेत उद्गारलो. “काय लं ये!! कोंबल्या भाल्या. लोज-लोज बगतोय , भाल्या, लांदच्या आमच्याच कोंबलीला तलास देतोस आणि पाकलतोस बी. आता बत बोंबलत”.
हे माझे बोबडे उद्गार ऐकून आणि माझा एकूणच जमदग्नी अवतार बघून, जवळच कोयता पाजरत बसलेला भीमा गडी आणि गल्लीतून जाणारे एक दोघे स्तिमित झाले. आणि माझ्याकडे बघतच राहिले. आता मात्र मी घाबरलो कारण मला वाटलं, मी मंगल्याकाच्या कोंबड्याला मारलं म्हणून आता माझं नाव हे लोक आता तीला नक्की सांगणार. मग आता माझ काय खरं नाही. मला अक्षरशः ब्रम्हांड आठवल. पण झालं वेगळंच. त्यांना माझ्या एकंदरीत वागण्यात बोलण्यात काय विनोद वाटला काय माहीत, पण ते माझ्याकडे आणि एकमेकांकडे आळी-पाळीन बघून खो-खो हसतच सुटले. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. हायस वाटल. आणि मी मात्र इकड-तिकड न बघता पटकन घरात धुम ठोकली.
पुन्हा पुढे जेंव्हा-जेंव्हा, आयुष्याच्या विविध टप्प्यावर गावाकड गेल्यावर हे "त्या" प्रसंगाचे साक्षीदार भेटले, तेंव्हा-तेंव्हा त्या प्रसंगाची हसून आठवण करून देत राहीले. त्यामुळे तो प्रसंग माझ्यासाठी वेगळ्या अर्थानी “अविस्मरणीय” ठरला.
क्रमश...
लेखक: बाळासाहेब उर्फ सुधाकर तानवडे

No comments:
Post a Comment