रम्य ते बालपण -आठवणींचा कोलाज - ३
(काळ साधारण सन 1970 ते 1973)
आई-बाबा आणि भावंड प्रातःकाली उठुन राखुंडीने दात घासून, तोंड धुवून आणि इतर महत्वाची कामे आटोपून स्वयंपाक घरात सामूहिक चहापानासाठी जमत असत, आई किंवा बहिणी कडून चूल शाडून सारवून चुलीवर चहाच आदन ठेवलं जायचं. मग चहा घेता घेताच, चुली समोर शेकत-शेकत, काल झालेल्या कामाचा आढावा घेतला जायचा. तसेच आज शेतात काय काय काम करायची? किती गडी माणस बोलवायची याचा प्लॅन सकाळच्या जड झालेल्या आवाजात सुरू असायचा. त्यातूनच आईची जेवणाची लगभग चालू झालेली असायची. घरातील आंघोळीच्या पाण्याचा हौद, पिण्याच्या पाण्याचे दोन मोठे तांब्याचे डेरे आणि एक मातीचं मडकं भरण्यासाठी दोन किलोमीटर लांब झऱ्या वरुण किंवा नदी वरुण काखेत एक आणि डोईवर एक अशा तांब्याच्या घागरी घेऊन दोघी बहीणींच्या पाण्याच्या खेपा गल्लीतील इतर मुली-बायासोबत चालू झालेल्या असायच्या.
मी मात्र सकाळी जाग येताच, तोंड धुतल नाही धुतल, चहा प्यायला नाही प्यायला करत, बाहेर सम वयस्क चुलत भावंडांच्या बोकाळण्याच्या आवाजाने दारात धूम ठोकायचो. बाहेर थंडी असेल तर सगळेजण धुमी(शेकोटी ) भोवती शेकत बसलेले असत किंवा इतर वेळी मातीत खेळत, कोंडाळे करून चिवचिवाट करत बसलेले असायचे. शेकोटी असेल तर स्वतःची सासू आणल्याशिवाय शेकोटी जवळ नवीन मेंबरला एंट्री नसायची. सासू म्हणजे काय? तर धुमीत आहुति देण्यासाठी आजु-बाजुला पडलेले सुके गवत, सुकलेला पाला-पाचोळा किंवा काट्या-कुट्या आणणे .
या सकाळच्या सत्रातील दैनिक बालसभेची अध्यक्षा बऱ्याचदा अलक्याका(अलका आक्का) असायची. ही साधारण माझ्या छाया माईच्या वयाची. ही आम्हा बाल गोपाळात सीनियर होती म्हणून तिला आम्ही अलका आक्का, संक्षिप्त करून अलक्याका म्हणत असू. नंतर त्याही पुढे जाऊन अलक्या काका म्हणत असू. मग याच नियमाने इतर ही मोठ्या चुलत बहिणीना मंगल आक्का ला 'मंगल्या काका', तसेच लील्या काका ,'बण्या काका' ,'कमळ्या काका' म्हणत असू . तुम्हाला प्रश्न पडला असेल. जर चुलत्याला "काका" म्हणत असाल तर हा गोंधळ कसा सावरायचा? पण हा आमच्यासाठी गोंधळ नव्हताच मुळी कारण आम्ही आमच्या चुलत्याना 'तात्या' म्हणत असू . असो.
तर ही अलक्या काका बर्याचदा भुताखेताच्या आणि इतरही बऱ्याच कान्या(कहान्या) आम्हा पामराणा रंगवून सांगायची आणि आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन एकाग्रतेन ऐकायचो. काय रमून जायचो त्यात. त्या श्रोतुवृंदा मध्ये बऱ्याचदा मी, कल्पी(कल्पना), आवण्या(अरुण) आणि मधु दादा असायचो. हो समवयस्क असला तरी "मधु दादा" च, "मध्या" नाही बर का!. याबद्दल विस्ताराने थोडं नंतर. कधी कधी आमच्या पेक्षा एक-दोन वर्षांनी छोटे असणारे संज्या(संजू ), किरण्या(किरण), धोंडीची पण उपस्थिती असायची.
शिव्यांची लाखोली अथकपणे कशी वाहायची हे बाळकडू पण इथलंच. एकमेकांशी खेळतांना काय बिनसलं की अगदी एखादा मंत्र म्हणावं तसे एका लईत उद्घोशीत होणारी ती अव शब्दांची शृंखला प्रत्येकालाच अगदी मुखोद्गत होती. मात्र माझ्या बाबतीत म्हणाल तर, या नव्याने विकसित झालेल्या विशेष स्किल साठी, बक्षीस म्हणून घरात वारंवार मिळणार्या धम्मक-लाडु आणि चापट-पोळी मुळे माझी या विषयातील प्रगति इतरांच्या मानाने जरा लवकरच खुंटली.
खेळण्यासाठी माझे हक्काचे सवंगडी असायचे, माझ्याच वयाची चुलत भावंडे कल्पि आणि अवण्या. तसेच पुन्हा गल्लीतील इतर मुल ही बऱ्याचदा असायची. जस की चाळक्यांचा वस्या,दिवेकरांचा राजा,गणप्या तसेच गुरवाचा दिनक्या. सीजन प्रमाणे बदलणारे विविध खेळ घरात,गल्लीत सतत खेळत असू. जस की गोट्या,विटी-दांडू ,लंगडी,पळा-पळी,घुंपट फिरवणे,पतंग बनवून गोठणावर मोकळ्या जागेत उडवणे आणि बरेच. एकमेकांचे हाथ धरून साखळीने धावत समोरील भिडूला पकडण्यासाठी तर गावभर हुंदडत पळायचो. तसेच काजूच्या सीजन मध्ये काजूचा खेळही अगदी तहान भुक हरपुन खेळला जायचा. पावसाळ्यात पावसाच प्रमाण खुप असल्यामुळे घराच्या वरील मजल्यावरील भल्या मोठ्या लाकडी माडीवर अलक्याका,कल्पी सोबत काचा-कवड्या, दोरी उड्या सारखे मुलींचे खेळ सुद्धा खेळत असू. तसेच गल्लीतील सगळे बाल- गोपाळ जमुन, दोन संघ करून दडून-मिडून (लपा-छपी) ची धमाल सुद्धा माडीवरच धान्यांच्या कणगी,तट्टे, दरवाजे, लाकडे,अंथरूने यांच्या मागे लपून करत असु. एखादा आपला लपलेला भिडू समोरील हुडकणाऱ्या पार्टीला सापडत नसेल तर त्यांना चिडवत "आमच्या धन्याला हुडकून काढा की हुडकून काढा! नाहीतर हार माना " असं एका सुरात म्हणत पूर्ण घर डोक्यावर घेत असु. या दंग्यान, ऐन दुपारी, घर आणि गल्ली दणाणून जात असे. त्यात लाकडी माडी च्या धाड-धाड आवाजाची भर पडे. आणि असा खेळ रंगात आलेला असतानाच खाली दुपारी वामकुक्षी घेणारे आमचे "आबा" म्हणजेच माझे चुलते किंवा समोरील घरातील तापट "होडग्याचा मामा" झोपमोड झाल्यामुळे हाताला मिळेल ती काठी किंवा लाकूड घेऊन येत असत आणि हाताला मिळेल त्याला जंगी प्रसाद देवूनच या रंगलेल्या खेळाची मग सांगता करीत असत.
तसेच लग्नाच्या सीजन मध्ये म्हणजे उन्हाळ्यात बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे बार उडवत असु. माझी आजी जुन्या कपड्यांचे तुकडे करून तसेच तालुक्याच्या ठिकाणच्या शंकर शिंप्या कडून आणलेले तुकडे जोडून मोठया सुई दोऱ्यानी ओट्यावर वाकळ शिवत बसलेली असायची. तर तिच्याकडून कधी मागून, तर कधी ढापून मिळवलेल्या चिंध्यापासून आमचे नवरा-नवरी आणि त्यांचा कपडे पट आकार घ्यायचा. कागदाची बाशिंगे आणि चुरमुऱ्याच्या मुंडावळ्यानी ते लुटू पुटूचे नवरा-नवरी अजूनच सजायचे. मग लग्नात जे जे विधी पाहिलेले असायचे ते ते विधी जमेल तसे सांग्रसंगीत साजरे व्हायचे. एकदा तर आम्ही छोट्या संजू आणि शेजारच्या छोट्या सुमिच लुटुपुटूच लाईव लग्नच लावल होत. त्यावेळी छोट्या सुमिन लाजत-लाजत घेतलेला उखाणा आणि सुपारी सोडण्याच्या खेळातील " संजू -संजू सुपारी सोड " म्हटलेले आठवून आजही हसू येत.
मधु दादा बर्याचदा आम्ही खेळत असलेल्या बऱ्याचशा खेळांपासून अलिप्त असायचा.कारण त्याला खेळात हारण मान्य नसायच. त्याच्या या स्वभावामुळे माझी पण त्याच्याशी बर्याचदा बाचाबाची होऊन कट्टी फू असायची. पण माझ "तुझ माझ जमेना पण तुझ्यावाचून करमेना" या उक्ती प्रमाणे होत. त्यामुळे पहल करून त्याच्याशी "बट्टी" प्रथम मलाच करावी लागायची. कारण चुलत असला तरी मोठा भाऊ या नात्याने मला सतत त्याची गरज भासायची. थोडे दिवसच टिकणारा, कट्टी फू चा काळ वगळता, मी सतत त्याच्या सोबतच असायचो. तो जाईल तिकडे मी शेपटासारख आहेच. रवळनाथाच्या देवळात प्रत्येक सणाला.. बरोबर!, गावभर सत्य- नारायणाच्या पूजेचा प्रसाद घ्यायला.. बरोबरच!, सोंगी भजन बघायला.. बरोबर! , गावातील लग्नांच्या दुसर्या दिवशी सकाळी नवरा-नवरी चे मांडवातले खेळ बघायला सुद्धा बरोबरच.
तो माझ्या पेक्षा एखाद्या वर्षांनीच मोठा असेल पण दरारा असा की मला मधु दादा म्हणणं भाग पडायच.
मात्र हे ही तितकंच खर.. दरारा फक्त माझ्या पुरताच. इतर मोठ्या भावंडांसमोर तो शांत,अबोल आणि अगदीच शामळू होता..
क्रमश...
लेखक: बाळासाहेब उर्फ सुधाकर तानवडे

No comments:
Post a Comment